33 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात 26 वस्तूंवरील जीएसटी दर आधीच्या 18 टक्क्यांवरून आता 12 किंवा 5 टक्के असा करण्यात आला आहे. टायर, व्हीसीआर आणि लिथियम बॅटरीवर आता 28 ऐवजी 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. 32 इंचाच्या टीव्हीवरही आता 28 ऐवजी 18 टक्के जीएसटी घेतला जाईल.
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची 31 वी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जेटली यांनी निर्णयांचा तपशील दिला. एकूण 33 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात 26 वस्तूंवरील जीएसटी दर आधीच्या 18 टक्क्यांवरून आता 12 किंवा 5 टक्के असा करण्यात आला आहे. 28 टक्के जीएसटीच्या कक्षेतील 6 वस्तू आता 18 टक्के जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत, असे जेटली यांनी नमूद केले.
सीमेंट आणि अन्य 13 वेगवेगळे ऑटोमोबाइल पार्ट्स सध्या 28 टक्के जीएसटीच्या कक्षेतच ठेवण्यात आले आहेत. सीमेंटमधून 13 हजार कोटी तर ऑटोमोबाइल पार्ट्समधून 20 हजार कोटी इतका महसूल मिळतो. या वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के इतका केला गेल्यास 33 हजार कोटी इतक्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळेच यावर तूर्त कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
जीएसटी परिषदेचे महत्त्वाचे निर्णय
- 100 रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटावरील जीएसटी 18 वरून 12 टक्के
- 100 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सिनेमा तिकिटावरील जीएसटी 28 वरून आता 18 टक्के
- 28 टक्के जीएसटीच्या कक्षेत आता फक्त 34 वस्तू राहिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने चैनीच्या वस्तूंचा समावेश.
- सीमेंट आणि अन्य 13 वेगवेगळे ऑटोमोबाइल पार्ट्स सध्या 28 टक्के जीएसटीच्या कक्षेतच ठेवण्यात आले आहेत.
- मॉनिटर्स, टीव्ही स्क्रीन, टायर्स, पॉवर बँक या वस्तूंवरील जीएसटीदर 28 टक्क्यांवरून 18 टक्के इतका खाली आणला.
- एसी, डिशवॉशरवरील 28 टक्के जीएसटी कायम
- यात्रेकरूंसाठीच्या विशेष विमानात इकॉनॉमी क्लाससाठी5 टक्के तर बिझनेस क्लाससाठी 12 टक्के जीएसटी लागेल.
- सोलार प्रकल्पावर अवघा 5 टक्के जीएसटी आकारला जाईल.
- थर्ड पार्टी इन्श्यूरन्सच्या हप्त्यावरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी.
- जीएसटी रिफंडबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या लक्षात घेऊन ही प्रक्रिया आता अधिक सोपी करण्याचा निर्णय.