मुंबई: आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेला आता दुहेरी झटका बसणार आहे. अन्नधान्य आणि डेअरी उत्पादनावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे. जीएसटी कौन्सिलच्या 28 आणि 29 जून रोजी चंदीगढमध्ये झालेल्या बैठकीत काही महत्वाच्या वस्तूंवरील करात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याचबरोबर अन्नधान्य, लस्सी, दही यारख्या रोजच्या जेवणातील पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशी करण्यात आलेले जीएसटीचे दर 18 जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत असं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.
आतापर्यंत फक्त ब्रॅन्डेड आणि पॅकड् धान्य आणि पदार्थांवर जीएसटी लावण्यात येत होता. परंतु आता रीटेल स्वरूपात पॅकिंग करून विकण्यात येणाऱ्या पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या सामान्यांना आणखी त्रासाचा सामना करावा लागणार आहे. या जीएसटीचा परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचं व्यापारी संघटनांनी म्हटलं आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स महाराष्ट्रा आणि द पूना मर्चंट चेंबर्स या व्यापाऱ्यांच्या संघटनांनी केद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करायचं ठरवलं आहे.
अन्नधान्याबरोबर आणखी कोणत्या वस्तूंच्या जीएसटी मध्ये बदल करण्यात आले आहेत आणि नवे दर काय असणार ते पाहूया,
* प्रिंटरमध्ये वापरण्यात येणारी शाई - आधी 12 टक्के, यापुढे 18 टक्के
* चाकू, चमचे, फोर्क, पेन्सिल, शार्पनर वगैरे - आधी 12 टक्के, यापुढे 18 टक्के
* विजेवर चालणारे पंप, सबमर्सिबल पंप, बायसिकल पंप - आधी 12 टक्के, यापुढे 18 टक्के
* डेअरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मशीन, धान्याच्या मिलमध्ये वापरण्यात येणाऱ्या मशीन, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन - आधी 12, यापुढे 18 टक्के
* पवन चक्कीला लागणारे पार्टस, शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या मशिन्स, फळांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या मशीन - आधी 12 टक्के, यापुढे 18 टक्के
* एलईडी लॅंप आणि त्यासाठी लागणारे पार्टस - आधी 12 टक्के, यापुढे 18 टक्के
* ड्रॉईंग आणि मार्किंगसाठी लागणारे साहित्य - आधी 12 टक्के, यापुढे 18 टक्के
* सोलर वोटर हीटर - आधी पाच टक्के, यापुढे 12 टक्के
* लेदरच्या वस्तू - आधी 5 टक्के, यापुढे 12 टक्के
* चामड्याच्या वस्तू आणि फुटवेअर आणि त्याच्याशी संबंधित वस्तू - आधी पाच टक्के, यापुढे 12 टक्के
* मातीची भांडी - आधी पाच टक्के, यापुढे 12 टक्के
* रस्ते, पूल, रेल्वे , मेट्रो क्रिमेटोरियम वगैरेची कामे - आधी 12 टक्के, यापुढे 18 टक्के
* चेक्स, सुटे चेक्स किंवा चेकबुक - आधी कोणताही जीएसटी कर लागू नव्हता, यापुढे 18 टक्के
* वेगवगेळ्या प्रकारचे नकाशे - आधी कोणताही जीएसटी कर लागू नव्हता, यापुढे 18 टक्के
* ई वेस्ट - आधी 5 टक्के, यापुढे 18 टक्के
* टीव्ही चॅनेल्सवर गेस्ट अँकरला द्यावयाचा मोबदला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस करण्यात आली आहे.