नवी दिल्ली : नवीन मोबाईल फोन घ्यायचा तुमचा विचार असेल, तर या महिन्यातच घेऊन टाका. कारण जीएसटी काऊन्सिलने मोबाईल फोनवर लागणाऱ्या जीएसटीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून मोबाईल फोनच्या किमतीत वाढ होणार आहे. मोबाईल फोनवरचा जीएसटी 12 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आल्याची माहिती जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.





अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापाऱ्यांनाही दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी जीएसटी रिटर्न फाईल करण्याची तारीख 30 जून 2020 केली आहे. तसेच, ज्यांचे टर्नओव्हर 2 कोटींपेक्षा कमी आहे, त्यांना लेट रिटर्न फाईल करण्यावर दंड बसणार नाही. मात्र जीएसटी भरण्यास विलंब केल्यास 1 जुलैपासून व्याज द्यावं लागणार आहे.


विमानाच्या देखभाल, दुरुस्ती आणि एमआरओ सेवेच्या जीएसटी दरात घट करण्यात आली आहे. याआधी हा दर 18 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये होता. त्यामध्ये आता घट होऊन 5 टक्क्यांवर आणला आहे. जीएसटी परिषदेने हा निर्णय भारतात एमआरओच्या सेवेला चालना देण्याच्या उद्देशाने घेतला आहे.





जीएसटी काऊन्सिलच्या 39 व्या बैठकीत अर्थमंत्री निर्णला सीतारमण यांच्यासह अनेक राज्यांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामावरही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.