श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश): भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोमधून इन्सॅट थ्री डीआर या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाच्या मदतीनं हवामानासंबंधी नेमकी माहिती मिळवणं शक्य होणार आहे.

 

आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून जीएसएलव्ही एफ 05 या प्रक्षेपक यानातून हा उपग्रह सोडण्यात आला. अवकाशात पोहचल्यानंतर पुढील दहा वर्ष हा उपग्रह कार्यरत राहणार आहे.

 

दरम्यान, इस्त्रोच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी ट्विटरवरुन त्यांचं अभिनंदन केलं आहे.

 

2,211 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण 28 ऑगस्ट रोजी होणार होतं, पण तांत्रिक दोषांमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं होतं. 26 जुलै 2013 रोजी अवकाशात सोडलेल्या इन्सॅट 3डी उपग्रहासोबतच इन्सॅट-3डीआर काम करेल.

 

‘इन्सॅट-3डीआर’च्या माध्यमातून भारताला हवामानविषयक अत्याधुनिक माहिती उपलब्ध होणार आहे.  याआधी इस्रोने हवामानविषयक इन्सॅट -3डी उपग्रहाचे 26 जुलै 2013 रोजी फ्रेंच गियाना येथून प्रक्षेपण केलं होतं.