नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची घोषणा केली आहे. मात्र 2000 रुपयांची नोट चलनातून हद्दपार होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे 50 आणि 200 च्या नव्या नोटा आल्यानंतर 2000 ची नोट बंद होणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा किंवा नोट हळूहळू चलनातून हद्दपार करण्याचं सरकारचं काहीही नियोजन नसल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने किंवा आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट बंद होण्याबाबत काहीही संकेत दिलेले नाहीत, तर नोट बंद करण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल अरुण जेटलींनी केला.

दोन हजार रुपयांची नोट बंद होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. शिवाय या नोटेची छपाई बंद केली असल्याचीही चर्चा होती. मात्र आरबीआयने या नोटेची छपाई बंद केलेली नाही आणि नोट बंद करण्याचं काहीही नियोजन नसल्याचं यापूर्वी अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही स्पष्ट केलं होतं.

दोन हजार रुपयांची नोट बंद होण्याची चर्चा

सरकारने आरबीआयला दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्याचे आदेश दिले, असं वृत्त समोर आलं होतं. मात्र संसदेत 26 जुलै रोजी अरुण जेटलींना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं. दोन हजार रुपयांच्या 3.2 लाख नोटांची छपाई करण्यात आल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

चलनात आता 200 रुपयांची नोट

पन्नास रुपयांची नवी नोट चलनात आणण्याच्या घोषणेनंतर दोनशे रुपयांची नोटही बाजारात आणण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ लवकरच 200 रुपयांची नोट आणणार असल्याच्या वृत्तावर अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं.

सोशल मीडियावर नव्या दोनशे रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर केंद्रातर्फे या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आला. आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सूचनेनुसार दोनशेच्या नोटांचे तपशील करण्यात आले आहेत.

दोनशे रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नव्या नोटांच्या छपाईचे आदेश दिले. मैसूर आणि सालबोनीमधील प्रिंटिंग प्रेसना नोटांच्या छपाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा


दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना