नवी दिल्ली : पन्नास रुपयांची नवी नोट चलनात आणण्याच्या घोषणेनंतर दोनशे रुपयांची नोटही बाजारात आणण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' लवकरच 200 रुपयांची नोट आणणार असल्याच्या वृत्तावर अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं.


सोशल मीडियावर नव्या दोनशे रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर केंद्रातर्फे या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आला. आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सूचनेनुसार दोनशेच्या नोटांचे तपशील करण्यात आले आहेत.

दोनशे रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नव्या नोटांच्या छपाईचे आदेश दिले. मैसूर आणि सालबोनीमधील प्रिंटिंग प्रेसना नोटांच्या छपाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा


दोनशेच्या नव्या नोटा चलनात कधी येणार, त्या नेमक्या कशा असतील, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. सोशल मीडियावरील फोटोंनुसार दोनशेच्या नव्या नोट्या जांभळट रंगाच्या असतील.

काहीच दिवसांपूर्वी आरबीआयने 50 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची घोषणा केली होती. पन्नास रुपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील.