नवी दिल्ली : आयकर विवरणपत्र (Income Tax Return)  भरण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. याआधी आयकर विवरण भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 ही होती. ही तारीख वाढवून आता 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे. त्यामुळे आयकर विवरण भरण्यासाठी आता दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


सेंट्र्ल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ( CBDT) ने कंपन्यांना देखील आयकर विवरण भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे. सेंट्र्ल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने एका परिपत्रकात म्हटलं की, करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 






आयकर कायद्यानुसार, ज्या लोकांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही आणि जे ITR फॉर्म -1 आणि ITR फॉर्म -4 च्या माध्यमातून सामान्यत: आयकर भरतात, त्यांची अंतिम मुदत 31 जुलै आहे. तसेच ज्या कंपन्यांचं ऑडिट होते त्यांची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.


आयकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात


आयकर विभाग आपले नवीन ई-फाईलिंग पोर्टल www.incometax.gov.in, 7 जून 2021 रोजी सुरू करणार आहे. नवीन ई-फाईलिंग पोर्टलचा उद्देश (www.incometax.gov.in) करदात्यांना सुविधा पुरवणे आणि आधुनिक गतिमान अनुभव प्रदान करणे हा आहे . हे पोर्टल सुरु करण्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतरण कामांसाठी विभागाचे विद्यमान पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in करदात्यांसह अन्य बाह्य हितधारकांना 6 दिवसांच्या अल्प कालावधीसाठी म्हणजेच 1 जून, 2121 ते 6 जून पर्यंत , 2021 उपलब्ध नसेल. .


करदात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विभाग या कालावधीत कोणत्याही अनुपालन तारखा निश्चित करणार नाही. तसेच  करदात्यांना नवीन प्रणालीवर प्रतिसाद देण्याबाबत वेळ देण्यासाठी 10 जून, 2021 पासून केवळ खटल्यांच्या सुनावणीच्या तारखा किंवा अनुपालन तारखा  निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर, या कालावधीत ऑनलाइन सबमिशन आवश्यक असणारी कोणतीही सुनावणी किंवा अनुपालन ठरवले असेल तर ते अगोदर घेतले  जाईल किंवा पुढे ढकलले जाईल आणि या कालावधीनंतर कामाचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.