जम्मू : जम्मू-काश्मीरमधील सहा महिन्यांची राज्यपाल राजवट 19 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने शिफारस केली होती. त्यावर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले.

जून महिन्यात भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीरमधील पीपल डेमोक्रेटिक पार्टीचा (पीडीपी) पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले होते. तसेच राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षानेदेखील मुफ्ती यांच्या सरकारला पाठिंबा देण्यास असहमती दर्शवली. परिणामी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली.

राज्यातील सरकार कोसळल्यानंतर तत्कालीन राज्यपाल नरिंदर नाथ वोहरा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. या शिफारशीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली होती.

काल (19 डिसेंबर) रोजी जम्मू-काश्मीरमधील राज्यपाल राजवटीचे सहा महिने पूर्ण झाले. त्यामुळे आजपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.