नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाविरोधात महाआघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची चिन्हं आहेत. कारण उत्तर प्रदेशात काँग्रेसला डावलून मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सप-बसप यांची जागावाटपाबाबत बोलणीही पार पडल्याची माहिती आहे. अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकशाही दलालाही महाआघाडीत सोबत घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसप 38, समाजवादी पक्ष 37, तर रालोद तीन अशा 78 जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसचा सहभाग नसला, तरी रायबरेली आणि अमेठीतून महाआघाडी उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत.

रायबरेली हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून सलग चौथ्यांदा खासदारकी मिळवली आहे, तर अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सलग तीन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. महाआघाडीत हे दोन मतदारसंघ वगळता सर्व जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत.

मायावती आणि अखिलेश यांच्या मनात काँग्रेसविषयीची खदखद गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, सप आणि बसप स्वतंत्र लढले होते. मात्र काँग्रेसला तीन राज्यात मिळालेल्या विजयानंतर मायावतींनी त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पाठिंबा दिला. तर अखिलेश यांनी मध्य प्रदेशात समर्थन दिलं होतं.

दुसरीकडे, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार मानायला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी नकार दिला आहे. लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याविषयी सांगितलं. द्रमुकचे एम के स्टॅलिन यांनी काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधी हे महाआघाडीचे नेतृत्व करतील, असं वक्तव्य केलं होतं. राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीलाही स्टॅलिन यांनी पाठिंबा दिला होता. परंतु प्रत्येकाचं मत हे स्टॅलिन यांच्यासारखं का असावं? असा सवालही अखिलेश यांनी विचारला.