मुंबई: राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागलेले आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी, यांची आयओएच्या मानद आजीव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच आयओएचे माजी अध्यक्ष अभय चौटाला यांनाही मानद अध्यक्षपद देण्यात आलं आहे.
चेन्नईत आयओएच्या वार्षिक सभेत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींची आयओएमध्ये एखाद्या मानाच्या पदावर निवड केली जाते, याविषयी क्रीडाक्षेत्रात अश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. आयओएच्या कारभारावरही त्यामुळं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कलमाडींच्या नियुक्तीची लगेचच दखल घेतली आहे. तसंच गोयल यांनी या प्रकरणी अहवाल मागितला असून, कारवाईचेही संकेत दिले आहेत.
सुरेश कलमाडी सध्या 72 वर्षांचे आहेत. कलमाडी यांनी 1996 ते 2011 या कालावधीत भारतीय ऑलिम्पिक संघटना अर्थात आयओएचं अध्यक्षपद सांभाळलं होतं.
2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचार समोर आला. त्यानंतर कलमाडींना आयओएचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. कलमाडींना या प्रकरणी अटक झाली होती आणि दहा महिने तुरुंगात काढल्यावर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
कलमाडी हे 2000 ते 2013 या कालावधीत आशियाई अॅथलेटिक्स संघटनेचेही अध्यक्ष होते. या संघटनेनं त्यांना गेल्या वर्षीच मानद अध्यक्षपद दिलं होतं.