नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे जस्टीस बी आर गवई, हिमाचल प्रदेश उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, झारखंडचे मुख्य न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि गुवाहाटीचे मुख्य न्यायाधीश ए एस बोपन्ना यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने 9 मे ला न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यासोबतच आणखी दोन नावे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली होती. यापूर्वी कॉलेजिअमची अनिरुद्ध बोस आणि ए एस बोपन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारने परत पाठवली होती.

सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले अनिरुद्ध बोस झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत. तर ए एस बोपन्ना गुवाहाटी उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत. जस्टीस बोस न्यायाधीशांच्या ज्येष्ठता सूचीमध्ये 12 व्या क्रमांकावर आहेत. तर जस्टीस बोपन्ना यांचा 36 वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी न्यायमूर्ती बोस यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस देखील सरकारकडून परत पाठवण्यात आली होती.