नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आधी पाच VVPAT मशीन्सची पडताळणी करण्यात यावी आणि फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व VVPAT ची मोजणी व्हावी, ही विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतजोणीला दोन ते तीन दिवस लागतील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.


VVPAT आणि ईव्हीएम मशीनच्या मतांमधे फेरफार आढळल्यास VVPAT ची मतं ग्राह्य धरली जाणार आहेत. त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व मशीनची मतमोजणी होणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.


रविवारी लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस, एसपी, बीएसपी, टीएमसीसह देशातील 22 विरोधीपक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. VVPAT ची पडताळणी करताना जर काही विसंगती आढळली तर सर्व मतदान केंद्रांवर VVPAT चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.


ईव्हीएमवरुन गोंधळ झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेते चौकीदार बनले आहे. ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये उमेदवारांनी दौरे सुरु केले आहेत. उमेदवारांनी ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यासाठी आपले प्रतिनिधीही स्ट्राँगरुमच्या जवळ नेमले आहेत.


ईव्हीएम मशीनबाबतच्या आरोपांवर बोलतांना मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं की, ईव्हीएम सोबत छेडछाड आणि बदल करणे शक्य नाही. नवीन ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्यास मशीन फॅक्टरी मोडवर जातं. त्यामुळे ईव्हीएम मशीनशी छेडछाड करणे अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.