गोरखपूर : गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं. योगी आदित्यनाथ यांनी आज रुग्णालयाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा हे देखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''या घटनेची चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणाची पंतप्रधान मोदींनीही गंभीर दखल घेतली असून, पंतप्रधानांकडून मदतीचं आश्वासन मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यावेळी प्रचंड भावूक झाले होते.

माध्यमांतून होणाऱ्या रिपोर्टिंग बाबतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, ''माध्यमांनी या प्रकरणातील चुकीच्या माहितीवर नाही, तर वास्तविक रिपोर्टिंग केलं पाहिजे. यासाठी माध्यम प्रतिनिधींनी स्वत:  रुग्णालयात जाऊन पाहाणी करावी. तिथं मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच माध्यमांनी रिपोर्टिंग करावं. त्यासाठी माध्यम प्रतिनिधींना सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आदेश, रुग्णालय प्रशासनला दिले आहेत,'' असं त्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''Encephalitis (मेंदूचा ताप) विरोधात 1996  पासून मी लढा देत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संसदेत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या आजाराविरोधात सर्वांनी एकजूट होऊन लढण्याची गरज आहे''

दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी राजीव राउतेला यांनी आपल्या अहवालात धक्कादायक खुलासा केला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाल्यानेच मुलांचा मृत्यू झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमुद केलं आहे.

दुसरीकडे मुलांच्या मृत्यूसाठी ऑक्सिजनची कमतरता कारण नसल्याचा, दावा उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी शनिवारी केला. तसेच गेल्या काही वर्षांमधील ऑगस्ट महिन्यातील मुलांच्या मृत्यूची आकडेवारीही त्यांनी काल सादर केली.

संबंधित बातम्या

'गोरखपूरमधील 36 मुलांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाही'


गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू


गोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं 30 मुलांचा मृत्यू