नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्लॅकमेलर असल्याचं वक्तव्य आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी आपले म्हणणे थोपवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करतात, यामुळे नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी या आठवड्यात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी पहिलं समोरच्या व्यक्ती विरोधात प्रकरण निर्माण करतात. नंतर त्याला त्यातून सोडवतात आणि मग त्याला ब्लॅकमेल करतात, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला. मोदींनी राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात प्रकरण दाखल करायला लावले होते, असे सीबीआयचे संचालकांनी यापूर्वीच सांगितले असल्याचा दावा नायडू यांनी केला. मोदींना भीती आहे की त्यांचे खरे रुप लोकांसमोर येईल. कारण त्यांनी मागील पाच वर्षात काहीच केलेलं नाही, असे नायडू म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरही नायडूंनी शाब्दिक हल्ला केला. ते म्हणाले, 'केसीआर आणि मोदींना वाटत आंधप्रदेशची प्रगती होऊ नये. त्यामुळे ते मला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. के. चंद्रशेखर राव मोदींसोबत मिळून माझ्या विरोधात कट रचत आहे.'

गेल्या आठवड्यात देखील चंद्राबाबू नायडू यांनी मोदींवर टीका केली होती. ते म्हणाले मोदी असे व्यक्ती आहेत ज्यांनी देशासाठी काहीच केले नाही. ते गुजरातचे दिर्घकाळ मुख्यमंत्री होते मात्र गुजरातसाठीही त्यांनी काही केले नाही.