मुंबई : देशभरात 2018 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. अपघात आणि घातपाताच्या अनेक घटनांनी देश हादरला. अशाच 2018 या वर्षात घडलेल्या बातम्यांचा आढावा.


1. आंबेनळी बस दुर्घटना
28 जुलै 2018ला आंबेनळी घाटात खासगी बस तब्बल 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 31 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच अपघातासाठी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आंबेनळीचा हा अपघात ही संशयाच्या भोवऱ्याच सापडला.


2. भय्यू महाराज यांची आत्महत्या
इतरांना तणावातून बाहेर काढणारे आध्यत्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडत जून महिन्यात आत्महत्या केली. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोलिसांना सुसाईड नोट ही सापडली. मात्र भय्यू महाराज कोणत्याही प्रकारच्या तणावात नव्हते. त्यांच्या मृत्यूमागे दुसरेच काही कारण असून तपास करण्याची मागणी त्यांच्या मुलीनं केली.आरोपामुळे भय्यूजी महाराजानी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला ही शंका उपस्थित झाली.


3. अमृतसर रेल्वे दुर्घटना
19 ऑक्टोबर अर्थात दसऱ्याच्या दिवशी अमृतसरमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण देश हादरला. संध्याकाळी रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असताना अचानक आलेल्या रेल्वेने तब्बल 59 लोकांचा जीव घेतला. शेकडो लोक या दुर्घटनेत जखमी झाले. घटनेला जबाबदार कोण यासाठी चौकशी समितीही नेमण्यात आली. मात्र घटनेनं संपूर्ण देशावर शोककळा पसरली.


4. आश्विनी बिद्रे हत्याप्रकरण


महिला पोलिस अधिकारी आश्विनी बिद्रे यांच्या हत्याप्रकरणाचा अखेर यावर्षी छडा लागला. 2016 साली महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या होत्या. तब्बल एक वर्ष शोध घेतल्यानंतरही यश हाती आलं नाही. आश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांच्या आरोपावरुन पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली. तपासात हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.


5. पोलीस अधिकारी हिमांशू रॉय आत्महत्या
ज्यांच्या खाक्यानं दहशतवाद्यांचे धाबे दणाणले, त्या हिमांशू रॉय यांनी स्वत: वर गोळी झाडत आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉलवरने स्वत:चं आयुष्य संपंवलं. सुपरकॉप म्हटलं जाणारा एक कणखर अधिकारी आजारपणामुळे मे महिन्यात महाराष्ट्राने गमावला.


6. अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू
भारताची पहिली महिला सुपरस्टार समजली जाणाऱ्या श्रीदेवीचाही मृत्यू यावर्षी झाला. दुबईतल्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने सांगण्यात आलं. अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या, मात्र फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं.


7. बुराडी आत्महत्या प्रकरण
एकाच घरात लटकलेल्या 11 जणांच्या मृतहेदांनी यावर्षी अवघ्या देशाला हादरवून सोडलं. दिल्लीतल्या बुराडीतल्या परिवाराच्या मृत्यू प्रकारणावरही संशय व्यक्त करण्यात आला. मात्र घरात सापडलेल्या एका डायरीमुळे सगळा प्रकार उघडकीस आला. अंधश्रद्धेतून परिवारातील सर्वच लोकांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.


8. धुळे हत्याकांड
जुलै महिन्यात धुळ्यात एका अफवेनं पाच जणांचा जीव घेतला. लहान मुलांना चोरणारी टोळी समजून धुळ्यातील राईनपाडा गावात पाच जणांना जमावनं ठेचून मारलं. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात या सर्वांना मारहाण करण्यात आली. या घटनेत 23 जणांना अटकही करण्यात आली.


9. मंगळवेढ्याचं 'सैराट'
4 ऑक्टोबर 2018 रोजी मंगळवेढ्यात सैराटची भीषण पुनरावृत्ती घडली. समाजातील खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रेमविवाह केलेल्या पोटच्या मुलीला आई-वडिलानी संपवलं. अनुराधा बिराजदार ही वैद्यकीय शिक्षण घेत होती. मुलीने शेतातील सालगड्याच्या मुलांसोबत प्रेमविवाह केला. ही बाब तिच्या आई-वडिलांना पटली नाही. अनुराधानं आधी लिहलेल्या एका चिठ्ठीत भीती व्यक्त केली होती. त्यावरुनच त्याच्या आई-वडिलांनी तिला मारल्याचे उघड झाले.


10. गुदद्वारात हवा सोडल्याने मृत्यू
यावर्षी झालेल्या एका विचित्र अपघातानं साऱ्याचं लक्ष वेधलं. टाईमपास म्हणून एका कामगाराच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरने हवा सोडल्याने एकाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला. आदित्य जाधव हा एका कंपनीत काम करायचा. नातेवाईंच्या संशयावरुन सीसीटीव्ही तपासण्यात आलं. यामुळे धक्कादायक घटनेचा खुलासा झाला. याप्रकरणी कारखान्यातील सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला.


11. घाटकोपर विमान दुर्घटना
28 जूनला आकाशातून कोसळलेल्या विमानामुळे मुंबईकरांची पायाखालची जमीन सरकली. घाटकोपरसारख्या अंत्यत वर्दळीच्या भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर चार्टर्ड प्लेन कोसळलं. दुपरची वेळ आणि कामगारांची जेवणाची वेळ यामुळे सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली. मात्र विमानातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला.


12. शिवस्मारक दुर्घटना
मुंबईतल्या उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला 24 ऑक्टोबर रोजी गालबोट लागलं. पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बोटीतल्या ताफ्यातील एक बोट खडकावर आदळून बुडाली. बोटीतील 25 पैकी 24 जणांना यातून वाचवण्यात यश आलं. मात्र सिद्धेश पवार या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.