Google Doodle : दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता दिवंगत शिवाजी गणेशन (Sivaji Ganesan) यांची आज 93 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने डूडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बंगळुरुतील कलाकार असलेल्या राजेश चोकसी यांनी हे डूडल तयार केलं असल्याची माहिती गुगलने दिली आहे.  


शिवाजी गणेशन यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1928 रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील विल्लुपूरम या ठिकाणी झाला. त्यांचं मूळ नाव गणेशमूर्ती असं होतं. एका थिएटर ग्रुपमध्ये सामिल होण्यासाठी त्यांनी केवळ सात वर्षाचे असताना आपलं घर सोडलं. डिसेंबर 1945 मध्ये शिवाजी गणेशन यांनी 'शिवाजी कांडा हिंदू राज्यम' या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित असलेल्या नाटकामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केली. त्यानंतर त्यांच्या नावासमोर 'शिवाजी' ही उपाधी लागली आणि ते शिवाजी गणेशन म्हणून ओळखले जाऊ लागले. 


शिवाजी गणेशन यांनी अनेक तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम चित्रपटात काम केलं आहे. 1952 सालच्या 'पराशक्ती' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. आपल्या पाच दशकांच्या अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांत काम केलं. त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, 'काहिरा अॅफ्रो-आशियायी फिल्म फेस्टिवल'मध्ये पुरस्कार जिंकणारे शिवाजी गणेशन हे पहिलेच भारतीय अभिनेते होते. 


शिवाजी गणेशन यांनी नंतरच्या काळात राजकारणात पाऊल टाकलं. लॉस एन्जल्स टाईम्सने त्यांना 'दक्षिण भारतीय चित्रपटातील मार्लन ब्रॅन्डो' असं म्हटलं होतं. या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू वयाच्या 75 व्या वर्षी, 21 जुलै 2001 रोजी झाला. 


 




संबंधित बातम्या :