Google Doodle: भारताच्या पहिल्या महिला पायलट सरला ठुकराल यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त गुगलने आज त्यांच्या सन्मानार्थ डूडल (Doodle) बनवून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. त्यांची ऐतिहासिक कामगिरी या डूडलमध्ये दाखवण्यात आली आहे. सरला ठकराल यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 1936 साली विमान उडवून इतिहास घडवला. कलाकार वृंदा झवेरी यांनी त्यांच्या सन्मानार्थ हे डूडल तयार केले आहे.
गुगलने म्हटलंय, की "सरला ठुकरालने देशातील सर्व महिलांसाठी एक उत्तम उदाहरण मागे सोडले आहे. याच कारणामुळे आम्ही तिच्या 107 व्या जयंतीनिमित्त तिला हे डूडल समर्पित केले आहे." तसेच गुगलने म्हटलंय, की "वयाच्या 21 व्या वर्षी पारंपारिक साडी परिधान करून सरला ठकरालने दोन पंखांच्या लहान विमानाच्या कॉकपिटमध्ये पाऊल टाकून एकटीने पहिले उड्डाण केले. सरला यांनी आपल्या पहिल्या उड्डाणासोबत आकाशाला गवसणी घालत एक नवीन इतिहास रचला. चला सरला ठकराल बद्दल जाणून घेऊया.
8 ऑगस्ट 1914 रोजी दिल्लीत जन्म
सरला ठकराल यांचा जन्म आजच्या दिवशी 8 ऑगस्ट 1914 रोजी दिल्लीत झाला. त्यानंतर त्यानंतर त्या लाहोर (पाकिस्तान) येथे गेल्या होत्या. त्यांचे पती कॅप्टन पीडी शर्मा एअरमेल पायलट होते. आपल्या पतीपासून प्रेरित होऊन सरला ठकराल यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण सुरू केले. 1936 मध्ये जेव्हा सरला ठुकरालने पहिल्यांदा दोन पंखांचे छोटे विमान उडवले, तेव्हा ती अवघ्या 21 वर्षांची होती आणि चार वर्षांच्या मुलीची आई देखील.
सरला ठकरालची ही ऐतिहासिक कामगिरी फक्त सुरुवात होती आणि ती इथेच थांबली नाही. लाहोर फ्लाईंग क्लबची विद्यार्थिनी म्हणून तिने 1,000 तासांचा उड्डाण वेळ पूर्ण करून वैमानिकाचा परवाना मिळवला. असे करणारी ती पहिली भारतीयही होती.
दुसऱ्या महायुद्धामुळे ठकराल व्यावसायिक पायलट बनू शकल्या नाहीत
सरला ठकराल यांचे पती कॅप्टन पीडी शर्मा यांचे 1939 मध्ये विमान अपघातात निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर ठकरालने व्यावसायिक पायलट बनण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याची तयारी सुरू केली. पण त्यावेळी चालू असलेल्या दुसऱ्या महायुद्धामुळे ती त्यात प्रगती करू शकली नाही आणि तिचे व्यावसायिक पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. सरला ठुकराल यांनी लाहोरच्या मेयो स्कूल ऑफ आर्ट्समधून ललित कला आणि चित्रकलेचे शिक्षण घेतले. हे आता राष्ट्रीय कला महाविद्यालय म्हणून ओळखले जाते.
1947 मध्ये फाळणीनंतर भारत परतली
1947 मध्ये भारत-पाकिस्तान विभाजनानंतर सरला ठकराल भारतात परतल्या. येथे दिल्लीत राहून त्यांनी चित्रकलेचे काम चालू ठेवले आणि नंतर दागिने आणि ड्रेस डिझाईनला आपलं करिअर बनवले. 1948 मध्ये त्यांनी आरपी ठकरालसोबत दुसरे लग्न केले. 15 मार्च 2008 रोजी त्यांचे निधन झाले.