हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये चोराने रविवारी रात्री पुरानी हवेलीमधील निजामच्या म्युझियममधून हिरेजडित सोन्याचा डब्बा आणि सोन्याचा चहाचा कप चोरला. हे चोर व्हेंटिलेटरच्या मार्गावरुन म्यूझियममध्ये घुसले होते. डब्बा आणि कप अतिशय मौल्यवान होता. हैदराबादचा शेवटचा आणि (सातवा) निजाम मीर उस्मान अली खान, असफ जाह यांनी याचा वापर केला होता.
म्युझियमच्या अधिकाऱ्यांनी या वस्तूंची चोरी झाल्याची माहिती दिली. चोरांना पकडण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी दहा पथकांची स्थापना केली आहे. त्यानंतर आंतराष्ट्रीय लिलावात या प्राचीन वस्तूंची किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. रुबी आणि हिरेजडित या तीन थरांच्या या डब्ब्याचं वजन दोन किलो आहे.
पुरावे नष्ट होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता. चोर लाकडी व्हेंटिलेटरद्वारे म्युझियममध्ये घुसला आणि दोरीच्या साहाय्याने भिंत चढून पार केली. चोराला म्युझियममधल्या या खोलीची संपूर्ण माहिती होती. त्याने सीसीटीव्ही कॅमेराही फिरवला होता, जेणेकरुन चोरी करताना पकडलं जाऊ नये.
चोरी केल्यानंतर चोर त्याच रस्त्याने परत गेला. सोमवारी सकाळी नऊ वाजता म्युझियम उघडल्यानंतर या दोन वस्तू गायब असल्याचं कर्मचाऱ्यांना दिसलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा ब्लर असल्याचं पोलिसांनी समजलं. या चोरीमागे म्युझियममध्ये काम करणारा कर्मचारी किंवा माजी कर्मचाऱ्याचा हात असू शकतं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या म्युझियममध्ये सध्या 450 वस्तू प्रदर्शनाला मांडल्या आहेत, ज्यामधील बऱ्याच वस्तू सातवा निजाम आणि मीर महबूब अली खान यांच्या आहेत. या वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 250 पासून 500 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.