पणजी : पुण्याहून गोव्यातील दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी आलेली एक तरुणी ओहळात बुडाली. सोनावळी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रविवारी सकाळी ही घडली. सुहागता बसू (वय 25 वर्ष) असं तरुणीचं नाव असून ती मूळची पश्चिम बंगालची आहेत.


सुहागता बसू ही व्यवसायाने पीक महिंद्रा कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होती. बसूला वाचवण्यासाठी तिच्या तीन सहकार्‍यांनी प्रयत्न केले, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिघेही वाहून गेले. धडपड करुन त्यांनी झाडाच्या आधाराने स्वतःचा जीव कसाबसा वाचवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातून ट्रेकिंगसाठी दोन गट रविवारी पहाटे पाचच्या सुमारास निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून कुळेत आले होते. हे दोन्ही गट दूधसागर धबधब्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या सोनावळी स्थानकावर उतरले होते. 13 जणांच्या एका गटात सुहागता बसू आणि तिचा एक मित्र असे दोघेजण पुण्यातील आयटी सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी होते. तर इतरजण विविध भागातून आले होते.

पोलिस निरीक्षक निलेश धायगोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस आणि वन विभागाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने सायंकाळी उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली.

वनपाल परेश पोरोब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट वन विभागाच्या परवानगीशिवाय जंगलात गेला होता. तसंच त्यांच्याबरोबर एकही स्थानिक गाईड नव्हता. पुणे येथील एका ट्रेकर गाईडने हा ट्रेक आयोजित केला होता. यापूर्वीही दोनवेळा तो ट्रेकर्सना घेऊन दूधसागरवर आला होता अशी चर्चा आहे.