पणजी : अल्पवयीन मुलीची खरेदी करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गोव्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बाबूश मॉन्सेरात यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस मागील काही दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. आमदार मॉन्सेरात यांनी गुरुवारी पणजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर त्यांना अटक केली.


 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात आई-मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय तक्रारदार मुलगी मूळची नेपाळची आहे. सावत्र आई आणि आणखी एका महिलेने मला 50 लाख रुपयांत मॉन्सेरात यांना विकल्याचा आरोप मुलीने केला आहे. या प्रकरणी आईविरोधात पणजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पणजीच्या महिला पोलिस ठाण्यात हे प्रकरण हस्तांतरित करण्यात आलं.

 

अनेक वेळा मुलीचं लैंगिक शोषण

मार्च महिन्यात मॉन्सेरात यांनी मुलीची खरेदी केली होती. त्यानंतर मॉन्सेरात यांनी त्यांच्या बंगल्यावर  मुलीला कैद करुन ठेवलं होतं. धमकी देऊन त्यांनी अनेकदा मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. मॉन्सेरात यांच्यावर बलात्कार करणे, इजा पोहोचवणे, फसवणूक करुन कैदेत ठेवणे, व्यक्तीची खरेदी करुन शोषण करणे या गुन्ह्याअंतर्गत भारतीय दंड विधान, गोवा बाल कायदा आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्यांतर्गत (POCSO) कलम 376, 328, 342, 370(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हे राजकीय षडयंत्र : बाबूश मॉन्सेरात

बाबूश मॉन्सेरात हे सेंट क्रूझ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र काही काळापूर्वीच त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली.

 

दरम्यान, "मॉन्सेरात यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हे माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र आहे," असं मॉन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

 

"माझ्या शोरुमची देखरेख करण्यासाठी मी त्या मुलीला नियुक्त केलं होतं. त्याआधी मी तिच्या आई-वडिलांशी बोललो होतो, जे माझ्याच मतदार संघात राहतात. चार हजार रुपयांची चोरी करताना आढळल्याने मुलीची हकालपट्टी करण्यात आली," असं मॉन्सेरात म्हणाले.

 

पणजी पोलिसांनी मॉन्सेरात यांच्या शोरुमसह अनेक संशयित ठिकाणांची झाडाझडती घेतली. पुढील तपास पणजी पोलिस करत आहेत.