पणजी : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. यात आता गोव्याचाही समावेश झाला आहे. गोव्यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा कर्फ्यू संध्याकाळी 10 ते सकाळी 6 या वेळेत असेल. गोव्यात 21 ते 30 एप्रिल दरम्यान नाईट कर्फ्यू सुरू राहणार आहे. एएनआयच्या माहितीनुसार, आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाढत्या कोरोना केसेसमुळे गोव्यातील कॅसिनो, बार, रेस्टॉरंट्स आणि सिनेमा हॉल आता 50 टक्के क्षमतेमध्ये सुरु ठेवता येणार आहेत.


गोव्याचे सीएम प्रमोद सावंत यांनी नुकतीच गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर म्हणाले की, कोविडच्या राज्यातील स्थितीबद्दल गृहमंत्री यांना कळविण्यात आले आहे. राज्यात चाचणी वाढविण्यात आली असून, कोविड पॉझिटिव्हची अधिक घटना घडली आहेत.


आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की, लॉकडाउन न करता राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळली जाईल. राज्यात कोरोना चाचणी वाढवण्यात आल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आजच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. "मी गृहमंत्र्यांना भेटलो आणि गोव्यातील कोविड व्यवस्थापनाबद्दल त्यांना माहिती दिली. कोणताही लॉकडाउन होणार नाही. परंतु, आम्ही आज संध्याकाळी काळजी घेण्याबाबत निर्णय घेऊ," असं मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात दुसर्‍या लाटेबाबत बोलताना सावंत म्हणाले, "कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेत 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना जास्त संसर्ग होत आहे." ते म्हणाले, "लोक उपचारांसाठी उशिरा येत आहेत. म्हणूनच मृत्यू वाढत आहेत. भीतीमुळे लोक घरीच राहतात. लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी स्वत: रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी आम्ही काहीही करू शकत नाही." 


ते म्हणाले की, महाराष्ट्रातून गोव्यात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत गोव्यामध्ये 694 नवीन कोरोना रुग्णांची नोद झाली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.