Goa Assembly Election 2022: गोव्यात पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याचपार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पार्टीनं (GFP) काँग्रेसशी (Congress) युती केल्याची घोषणा केलीय. यापूर्वी जीएफपीनं भाजपसोबत सत्तेत भागीदारी केली होती. मात्र, 2019 जुलै महिन्यात जीएफपी पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह तीन आमदारांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षानं भाजपली दिलेल्या पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी सरदेसाई  प्रमोद सावंतच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.


"राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जीएफपीनं युती केलीय. विजय सरदेसाई यांनी आमचे नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. तसेच त्यांना भाजपचा पराभव करण्यासाठी काम करायचं असल्याचं सांगितलं. त्यामुळं गोव्यात बदल घडवून आणता येईल. त्याच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो", असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी म्हटलंय. 


"गोव्यात दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली. छोट्या-मोठ्या मुद्यावरून दोन्ही पक्षात संभाषण झालं. आम्ही नवीन पर्वाला सुरुवात करीत आहोत. राजकारणात मैत्रीची, युतीची नेहमीच शक्यता असते आणि आमचा एकमेकांवर विश्वास असतो. आम्ही आगामी निवडणूक सोबत लढण्याचा निर्णय घेतलाय. जीएफपी आणि काँग्रेस यांच्यातील युती लोकांना प्रेरीत केरल", असंही त्यांनी म्हटलंय.  


दरम्यान सरदेसाई म्हणाले की,  "जीएफपी आणि काँग्रेस यांच्यातील युती भाजपमुक्त करेल. भाजपच्या भ्रष्टाचार आणि जातीयवादापासून मुक्त करण्यासाठी नव्यानं चळवळ सुरू करण्याची गरज आहे. यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. राहुल गांधींच्या निवासस्थानापासून जे सुरू झाले ते या गौरवशाली दिवशी संपले." सरदेसाई यांनी 18 दिवसांपूर्वी दिल्लीत राहुल यांची भेट घेतली होती, मात्र तेव्हापासून युतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha