भोपाळ : लोकसभा निवडणुकांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा तोरा खासदारपदी निवडून आल्यानंतरही कायम आहे. तुमची स्वच्छतागृहं आणि गटारं साफ करण्यासाठी मी खासदार झालेले नाही, असं उत्तर प्रज्ञासिंह यांनी दिलं. मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.


मध्य प्रदेशातील भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खासदारपदी निवडून आल्या आहेत. एकीकडे मोदी सरकार 'स्वच्छ भारत अभियाना'ला प्रोत्साहन देत असताना भाजपच्याच खासदाराचं हे वक्तव्य सर्वांच्या भुवया उंचावणारं आहे. सिहोर परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. याला उत्तर देताना 'माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेन, पण टॉयलेट साफ करणं हे माझं काम नाही' असं साध्वींनी म्हटलं.

'आम्ही गटारं साफ करण्यासाठी नाही आहोत. ठीक आहे ना? आम्ही तुमचं शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबातच नाही निवडून आलो. आम्ही जे काम करण्यासाठी निवडलो गेलो आहोत, ते काम आम्ही इमानदारीने करु. असं आम्ही पूर्वीही म्हणत होतो. आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचं म्हणणं तेच असेल' असं साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या.


लोकसभा निवडणुकीत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला. निवडणुकीपूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला.' या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. 'माझ्या वक्तव्याचा देशाच्या शत्रूंना फायदा होत असल्याचं मला वाटतं. त्यामुळे मी माझं वक्तव्य मागे घेऊन माफी मागते' असं म्हणत त्यांनी माफी मागितली होती.

'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणुकांपूर्वी केलं होतं. सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफीनामा मागितला होता.

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञाला कधीच मनापासून माफ करु शकणार नाही, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या होत्या. सभ्य समाजात अशी विचारधारा शोभत नसल्याचं मोदी म्हणाले होते.