पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय मटका व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. मटका व्यवसायाविरोधात गुन्हे शाखेची ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे. वोर्डा, सिकेरी, साळपे आणि कांदोळी इथे छापे टाकून 'बॉम्बे बाजार मटका' बंद पाडला. रहिवासी इमारतीमधून चालवल्या जाणाऱ्या व्यवसायावर छापा टाकल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणी मुंबईस्थित मटका व्यावसायिक प्रकाश सावला टोळीतील जयेश शहा, छोटूलाल लालन यांच्यासह गोवा आणि महाराष्ट्रातील 29 जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे रात्रीचा बॉम्बे मटका व्यवसाय ठप्प झाला आहे.

पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत, प्रज्योत फडते, मुख्य शिपाई संतोष गोवेकर, संजय पेडणेकर, दत्ता वेर्णेकर, नवीन पालयेकर, रुकेश हळर्णकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी मटका व्यवसायासाठी वापरण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पेडणे येथील छाप्यानंतर पोलिसांनी नजीकच्या काळात केलेली ही मोठी कारवाई आहे.