पणजी/ नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजारपणामुळे, गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे दोन आमदार फोडण्यात भाजपला यश आलं. भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट होताच, काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमच्यासोबत आणखी 2 ते 3 आमदार भाजपात येतील, असा दावाही काँग्रेसचे राजीनामा दिलेले आमदार सुभाष शिरोडकर यांनी केला आहे. काँग्रेसचे हे दोन्ही आमदार आज सायंकाळी भाजपात प्रवेश करणार आहेत.
आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे काल रात्रीच गोव्यावरुन दिल्लीत आले. या दोघांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. या आमदारासोबत भाजपाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेही दिल्लीत आहेत.
शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. मांद्रेचे आमदार सोपटे हे यापूर्वीच्या काळात भाजपामधून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळीही त्यांना मंत्री विश्वजित राणे यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये आणले होते, पण काँग्रेसच्या तिकीटावर त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
2017 च्या निवडणुकीत सोपटे हे काँग्रेसच्या तिकीटावर मांद्रे मतदारसंघात जिंकले. तिथे त्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभूत केले होते. आता सोपटे आणि शिरोडकर या दोघांनाही भाजपामध्ये प्रवेश दिला जाईल, शिवाय भाजपाचे तिकीटही दिले जाईल.
प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, मंत्री राणे आदींसोबत शिरोडकर आणि सोपटे हे अमित शहा यांना भेटतील. मग काँग्रेसमधील फूट अधिकृतरित्या जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस आमदार आजदेखील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या सरकारी बंगल्यावर जमले आहेत. दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, यावर सगळे आमदार आणि पदाधिकारी चर्चा करत आहेत.
गोवा विधानसभेतील संख्याबळ
दरम्यान, सध्या भाजपकडे 14, तर काँग्रेसकडे 14 आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड आणि मगोकडे प्रत्येकी 3 आमदार आहेत. तसेच सत्तेत सध्या 3 अपक्ष आमदार आहेत. सत्ताधारी गटाचे सध्याचे संख्याबळ 23 आहे. (भाजप 14+ मगोप 3+ गोवा फॉरवर्ड 3 + अपक्ष 3 = 23) . येत्या दोन दिवसांत नेतृत्व बदल झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला वेळ दिल्यानंतरही भाजपचे 3 आमदार विधानसभेत उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाचा आकडा 20 पर्यंत खाली येईल. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे दोन आमदार कमी झाल्यास 14 आमदार शिल्लक राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव जमेस धरून एकूण 15 जण विरोधात असू शकतात.
सभापती प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया
काँग्रेस आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी दिल्ली येथून फॅक्सने आपले राजीनामे पाठवले आहेत. दोघांशी मी विधानसभा सचिवांसमोर फोनवर बोललो आहे. राजीनाम्यासाठी कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. दोघांचे राजीनामे आपण स्वीकारले असून त्यामुळे सभागृहाचे संख्याबळ 38 झाले आहे. आता भाजपचे 14,काँग्रेसचे 14, मगो 3, गोवा फॉरवर्ड 3, अपक्ष 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी आता 20 सदस्य आवश्यक ठरणार आहेत.
गोवा विधानसभा एकूण सदस्यसंख्या - 40
सध्याची सदस्यसंख्या - 38
भाजप - 14
काँग्रेस -14
मगोप - 3
गोवा फॉरवर्ड - 3
राष्ट्रवादी 1
अपक्ष - 3
संबंधित बातम्या
गोवा काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या विमानात, मध्यरात्री राजकीय हालचाली
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात परतले
मध्यरात्रीची विमानवारी यशस्वी, भाजपने गोवा काँग्रेसचे दोन आमदार फोडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2018 02:13 PM (IST)
काँग्रेसचे दोन आमदार फोडण्यात भाजपला यश आलं. काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक,काँग्रेसचे मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे, शिरोडयाचे आमदार सुभाष शिरोडकर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -