Devendra Fadnavis Press Conferance : राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राज्यात बरेच मुद्दे सध्या तापलेले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात अनेक मुद्दे विरोधकांच्या भात्यात असणार आहेत. अधिवेशनापूर्वी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं झाली. अशातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशनं घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलुपबंद करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनातून केला जात आहे." 


देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "12 आमदार बाहेर ठेवून अध्यक्ष पदाची निवडणुक घ्यायची? याचा अर्थ हे सरकार किती असुरक्षित आहे हे दिसते. गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याची पद्धत असताना हे नियमबाह्य मतदान करण्याची तयारी करत आहे. नियम समितीचे नियम डावलून प्रस्ताव सादर करणार आहेत. लोकशाही कुलूप बंद करता येईल असं छोटे अधिवेशन सत्ताधारी घेत आहेत. राज्यात अधिवेशन घ्यायची मानसिकता नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. फक्त 'रोकशाही' आणि 'रोखशाही'  सुरु आहे."


भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार : देवेंद्र फडणवीस 


"भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार आहे. विरोधकांनी बोलू नये म्हणून एक-एक वर्षासाठी आमदारांना निलंबित करण्याचं काम या सरकारच्या दबावाखाली होत आहे. आपल्या आमदारांवर यांचा विश्वास नाही, म्हणून यांनी आमचे आमदार निलंबित केले आहेत.", असं म्हणत गेल्या अधिवेशनातील भाजप आमदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 


सरकारच्या नाकर्तेपणा ओबीसी आरक्षण गेलं : देवेंद्र फडणवीस 


ओबीसीबाबत हे सरकार उघडं पडलं. दोन वर्षं झाली तरी हे डेटा गोळा करू शकले नाही. दोन वर्ष या सरकारनं घालवली. या सरकारच्या नाकर्तेपणा ओबीसी आरक्षण गेले आहे, असा घणाघात ओबीसी आरक्षणावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. तसेच "विजेचे कनेक्शन कापण्याचे काम या राज्यात सुरु आहे. सुलतानी पद्धतीने वीज कनेक्शन कापण्याचं काम हे सरकार करत आहे. केंद्र सरकारने दिलेली मदत देखील हे सरकार पोहोचवू शकलेलं नाही. आमच्या काळात हजारो कोटींचा विमा मिळत होता तरी हे मोर्चे काढत होते. मात्र याच्या काळात सहा हजार कोटी विमा कंपन्यांच्या घशात घातलेत", असा आरोप फडणवीसांनी केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह