पणजी : मुख्यमंत्री किंवा नेतेमंडळी कुठे जात किंवा येत असतील तर त्यांचा ताफा भरधाव निघून जातो. रस्त्यावर काय चाललंय याची दखल फार कोणी घेताना दिसत नाहीत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा वारसा चलावत मुख्यमंत्री सावंत आपले राहणीमान साधे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रमोद सावंत हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असले तरी ते पेशाने डॉक्टर आहेत. दहा वर्षे डॉक्टर म्हणून त्यांनी काम केले आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा दिल्ली येथील बैठका आटोपून मुख्यमंत्री गोव्यात पोचले. दाबोळी विमानतळावरुन  पणजीला येताना झुवारी पुलावर त्यांना एक महिला पर्यटक अपघातग्रस्त झालेली दिसली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला ताफा थांबवून त्या महिला पर्यटकाची विचारपूस केली. तिला झालेली इजा गंभीर नसल्याची स्वतः खात्री केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिला आपल्या ताफ्या मधील एका गाडीतून हॉस्पिटलपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. मुख्यमंत्री मदतीला धावल्यामुळे जखमी महिला वेळेत उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोचू शकली.
शुक्रवार चार ऑक्टोबर पासून गोव्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जखमी महिला पर्यटकाच्या मदतीला धावून जात अतिथी देवो भव याची प्रचिती दिली. यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी अशाच पद्धतीने आपल्यातील वैद्यकीय पेशा आणि त्यातील सेवाभाव कायम असल्याचे दाखवून दिले आहे.