पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती अत्यंत खालावली  असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं ट्वीट  मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन देशभरात अफवा पसरवल्या जात आहेत. आज सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्बेत शनिवारी जास्त बिघडली होती. मात्र आता ती स्थिर असल्याचा दावा भाजपच्या सगळ्या नेत्यांकडून केला जात होता. मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी  मुख्यमंत्री ऑक्सिजनवर असून त्याला रिकव्हर व्हायला वेळ लागणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या विविध पर्यायांवर चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आजारपण बळावल्याने भाजपने आपले संख्याबळ वाढवून भाजप आघाडी सरकार भक्कम करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला खिंडार पडेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी सकाळीच केला होता.