बहुमत सिद्ध झाल्यास गोव्यात सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीवर यांच्याकडे गोव्याचं उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात येणार आहे.
मगोपला उपमुख्यमंत्रिपदासह दोन मंत्रिपदं मिळणार आहेत. तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
पर्रिकरांचा शपथविधी
गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांचा मंगळवारी 14 मार्चला शपथविधी झाला. पर्रिकरांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि दोन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ 21 वर आलं.
सुप्रीम कोर्टाचे आदेश
मुख्यमंत्री झालेल्या पर्रिकरांना अवघ्या 48 तासात म्हणजे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.
शपथविधीपूर्वीही बराच गोंधळ पाहायला मिळाला. पर्रिकर यांच्या शपथविधीला काँग्रेसनं थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, कोर्टानेही राज्यपालांप्रमाणेच निर्णय देत, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश काँग्रेसला दिले. मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती.
मनोहर पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण?
मनोहर पर्रिकर – मुख्यमंत्री, भाजप
फ्रांसिस डिसूजा- भाजप
पांडुरंग मडकेकर- भाजप
सुदिन ढवळीकर- मगोप
मनोहर त्रिंबक अजगांवकर- मगोप
विजय सरदेसाई- गोवा फॉरवर्ड पार्टी
विनोद पलियंकर- गोवा फॉरवर्ड पार्टी
जयेश विद्याधर साळगांवकर- गोवा फॉरवर्ड पार्टी
गोविंद गौडे- अपक्ष
रोहन खाउंटे- अपक्ष