पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुढील उपचारासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. अमेरिकेतून तिसऱ्यांदा उपचार घेऊन आल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. गेले चार दिवस कांदोळी येथील खाजगी दुकले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत पर्रिकर यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार दिल्ली येथील ‘एम्स’मध्ये दाखल केलं जाणार आहे. मुख्यमंत्री विशेष विमानाने दाबोळी विमानतळावरुन दिल्लीस रवाना झाले असून त्यांच्यावर पुढील उपचार एम्समध्ये केले जातील.

मनोहर पर्रिकर यांच्यासह वीज मंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा हे मंत्रीमंडळातील सहकारी आजारी असल्याने राज्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. पर्रिकर यांच्याकडे सर्व महत्वाची खाती असून त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने राज्याच्या कारभारावर परिणाम होत होता. विरोधी पक्ष काँग्रेसने याच मुद्द्यावरुन भाजप सरकारला घेरण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत. त्याचा दबाव सरकारवर वाढू लागला होता.

7 सप्टेंबर रोजी अमेरिकेतून गोव्यात येऊनही मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊन आपला कार्यभार सांभाळू शकले नव्हते. गेले 4 दिवस ते आपले नातेवाईक असलेल्या डॉ दुकले यांच्या कांदोळी येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते.

पर्रिकर दरवर्षी न चुकता आपल्या पर्रा येथील मूळ घरच्या गणपतीला हजेरी लावत असतात. यंदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना घरी जाणं शक्य झालं नव्हतं. काल सायंकाळी चार वाजता त्यांनी हॉस्पिटलमधून निघून विसर्जनापूर्वी फक्त गणपतीला नमस्कार करून आल्या पावली माघारी फिरणं पसंत केलं.

मुख्यमंत्री आणि इतर दोन मंत्र्यांच्या आजारपणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काल भाजपच्या गाभा समितीची तातडीची बैठक झाली. बैठकीनंतर सदस्यांनी दुकले हॉस्पिटलमध्ये येऊन पर्रिकर यांची भेट घेऊन महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. पाठोपाठ घटक पक्षांचे नेते विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, अपक्ष मंत्री रोहन खवंटे, गोविंद गावडे यांनी देखील पर्रिकर यांची हॉस्पिटलमध्ये येऊन भेट घेतली.

रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी आणि राजकीय घडामोडी सुरुच होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्रिकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून पद सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपणच पदावर राहा, असा सल्ला शाह यांनी पर्रिकर यांना दिल्याची माहिती आहे.

त्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, पर्रिकर यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्याचं ठरलं. सकाळी मुख्यमंत्री पर्रिकर हॉस्पिटलमधून निघण्यापूर्वी कळंगुटचे आमदार माइकल लोबो आणि सभापती प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री पर्रिकर आज आपल्याकडील अतिरिक्त खाती मंत्रीमंडळामधील इतर मंत्र्यांकडे सोपवणार असल्याचं लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं.

मुख्यमंत्री दिल्लीत उपचार घेत असताना नवीन नेता निवडून राज्य सरकारचा कारभार चालवला जातो की अन्य व्यवस्था करून पर्रिकरच दिल्लीमधून कारभार पाहणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपचे निरीक्षक येत्या दोन दिवसात गोव्यात येऊन परिस्थितीवर तोडगा काढण्याची शक्यता आहे.