पणजी: मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी आज आपला 353.61 कोटींच्या महसूली शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभेच्या आजच्या कामकाजावर पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना झालेल्या अटकेचे पडसाद उमटले. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज आज चार वेळा तहकूब करावे लागले. अर्थसंकल्प सादर केला जात असतानाही सभापतींसमोरील हौद्यात येऊन निषेधाच्या घोषणा देणाऱ्या विरोधी आमदारांना अखेर सभापतींच्या निर्देशानुसार मार्शलकरवी सभागृहा बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगत न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहील असे स्पष्ट केले आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
भाजपचे प्रवक्ता प्रेमानंद म्हांबरे यांना धमकावल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी मध्यरात्री पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्यात आली होती. विधानसभा सुरु असल्याने सभापतींची परवानगी मिळाल्या नंतर पर्वरी पोलिसांनी खंवटे यांना अटक करून सकाळी त्यांची जामिनावर सुटका केली होती.
विधानसभेच्या कामकाजाला आज सुरुवात होताच विरोधी आमदार खंवटे यांना झालेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती बांधून सभागृहात दाखल झाले. विरोधी आमदारांनी खंवटे यांना झालेल्या अटकेवर नाराजी व्यक्त करत सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतल्यानंतर दुपारी 12 पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. 12 वाजता कामकाज सुरु होताच विरोधक तोच विषय लावून धरत पुन्हा हौद्यात आल्यामुळे दुपारी साडे बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. साडे बारा वाजता कामकाज सुरु होताच विरोधक तोच विषय घेऊन पुन्हा हौद्यात आल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब केले.
भोजनानंतर पुन्हा अडीच वाजता कामकाज सुरु झाले तेव्हा देखील विरोधक एकत्र येऊन घोषणा देत सभापतींसमोरील हौद्यात आल्यामुळे सभापतींनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केले. 3 वाजता मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी सभागृहात दाखल झाल्यानंतर देखील विरोधक शांत झाले नाहीत. त्यांनी पुन्हा हौद्यात जाऊन घोषणाबाजी सुरुच ठेवली. सभापती पाटणेकर यांनी विरोधी सदस्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ती त्यांनी धूडकावून लावल्या नंतर सभापतींनी घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांना मार्शलकरवी सभागृहा बाहेर काढले. गोंधळ सुरु असताना देखील मुख्यमंत्री अर्थसंकल्पाचे वाचन करतच होते.
गोंधळ घालणाऱ्या विरोधी आमदारांना बाहेर काढल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहा समोर अर्थसंकल्प सादर केला. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी विद्यावेतन योजना जाहीर करण्यात आली असून त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कौशल्य विकासासाठी 6 नव्या प्रशिक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. गोवा साधन सुविधा विकास महामंडळातर्फे सुरु असलेले 50 हुन अधिक विकास प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार भर देणार आहे. झुवारी पूलाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची जोडणी करण्याचे लक्ष्य ठेवण्याबरोबरच म्हादईच्या प्रवाह क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सेंद्रीय शेती विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे.
शेतात काम करणाऱ्यांना मदत करण्यासाठी श्रम सन्मान ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या निवृतीचे वय 60 वरुन 62 करताना त्यांच्या मानधनात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी पतसंस्थामधील 1 लाख रुपया पर्यंतच्या ठेवींना आता विमा कवच मिळणार आहे. याशिवाय आबकारी कर वाढीतून 100 कोटी रुपयाचा महसुल मिळवण्याचे लक्ष्य ठेवताना प्रतिज्ञापत्रासाठी लागणारी स्टॅम्प ड्यूटी 50 रुपयावरुन 100 रुपये करण्यात आली आहे.
Goa Budget | गोवा विधानसभेत 353.61 कोटींच्या महसूली शिलकीचा अर्थसंकल्प सादर
देवेंद्र वालावलकर, एबीपी माझा
Updated at:
06 Feb 2020 10:05 PM (IST)
सभापती पाटणेकर यांनी विरोधी सदस्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ती त्यांनी धूडकावून लावल्या नंतर सभापतींनी घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांना मार्शलकरवी सभागृहा बाहेर काढले. गोंधळ सुरु असताना देखील मुख्यमंत्री अर्थसंकल्पाचे वाचन करतच होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -