गोरखपूर : हिंदू असणे याचा अर्थ मंदिरात जाणे, पूजा करणे आणि टीका लावणे असा होत नाही, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ रविवारी गोरखपूरच्या दौऱ्यावर होते. महंत दिग्विजयनाथ आणि महंत अवेद्यनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.


या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले की, "हिंदू होणे याचा अर्थ केवळ मंदिरात जाणे, पूजा करणे आणि टीका लावणे होत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत. लोक कल्याण हे त्यातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. परोपकार लोक कल्याणाचाच एक भाग आहे."


"भारतीय जीवन मूल्यांमध्ये स्वार्थाला जागा नाही. दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगणं हेच जीवन श्रेष्ठ आहे", असंही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. "तसेच कोणाची पूजा करावी आणि कोणाची नाही असं हिंदू धर्मात कुठेही म्हटलेलं नाही. मंदिरात जाणं आणि टीका लावणं याचाही उल्लेख हिंदू धर्मात नाही", असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.


केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. "भारतीय संस्कृतीचं मूळ वेद आहे. अज्ञान, अभाव आणि अन्याय हे मानवाची तीन मोठे शत्रू आहेत. आपल्याला ज्ञानाचं दीप प्रज्वलीत करून अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे", असा संकल्प केला पाहिजे  असं सत्यपाल सिंह म्हणाले.