याआधी राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'चोर' या शब्दाचा वापर केला होता. "गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है," असं राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल गांधी यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये राफेल कराराबाबत सांगितलं आहे. "या करारासाठी भारत सरकारने मला अंबानींच्या रिलायन्स या कंपनीचं नाव सुचवलं होतं आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. यानंतर दसॉल्टने अंबानींसोबत चर्चा केली. भारत सरकारने सुचवलेल्या मध्यस्थाची निवड आम्ही केली," असं फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांचं म्हणणं असल्याचं फ्रेन्च डिजिटल व्हिडीओ पब्लिशर ब्रूट सांगत आहेत.
व्हिडीओमध्ये ब्रूट हे 'मीडियापार्ट' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमधील फ्रान्स्वा ओलांद यांच्या मुद्द्यांचा हवाला देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना राहुल गांधी म्हणाले की, "कमांडर इन थीफबाबत हे दु:खद सत्य आहे."
दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकारने ओलांद यांचं कथित विधान फेटाळत म्हटलं की, "दसॉल्टने स्वत:च रिलायन्स डिफेन्सची निवड केली आणि यात सरकारची कोणतीही भूमिका नाही."
खरंतर राहुल गांधी आणि काँग्रेस मागील अनेक महिन्यांपासून आरोप करत आहेत की, "मोदी सरकारने फ्रान्सची कंपनी दसॉल्टशी करार करताना 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी जास्त दराने केली. यामुळे सरकारी तिजोरीचं कोट्यवधींचं नुकसान झालं."