Go First Airline: गो फर्स्ट विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर असाताना कंपनीसमोरील अडचणी देखील थांबण्याचे नाव घेत नाहीत. नुकतीच कंपनीने आपल्या दिवाळखोरीची माहिती दिली असली तरी या प्रकरणात एनसीएलटीची (NCLT) मंजुरी येणे बाकी आहे. विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर असताना गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांचेही नुकसान होत आहे. विमान कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे, अनेक विमान कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यातील अनेक कर्मचारी इंडिगो (Indigo), एअर इंडिया (Air India) आणि इतर काही एअरलाईन्समध्ये नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडू नये, असे आवाहन गो फर्स्टने (Go First) केले आहे. परंतु संतप्त कर्मचारी ऐकत नसल्याने त्यावर आता कंपनीने आपला आदेश जारी केला आहे. गो फर्स्ट एअरलाईन कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यापूर्वी सहा महिन्यांचा नोटीस कालावधी (Notice Period) पूर्ण करण्यास सांगितले आहे. एका महिन्याची नव्हे, तर तब्बल सहा महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करण्यास विमान कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे, नोटीस कालावधी पूर्ण केल्यानंतरच कर्मचाऱ्यांचा राजीनामा कंपनी स्वीकारेल.
गो फर्स्ट एअरलाईन्सची सर्व उड्डाणे 12 मेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. त्यातच एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने सांगितले, कंपनीने कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला. तर, आता एप्रिल महिन्यातील पगार कधी मिळेल, याची कर्मचाऱ्यांना काहीच कल्पना नाही.
कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कंपनीचं म्हणणं काय?
कंपनीतील कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पगार दिला जाईल, असे एअरलाइन्सचे सीईओ कौशिक खन्ना यांनी एका बैठकीत सांगितले. कंपनी अद्याप पूर्ण दिवाळखोरीत निघाली नसून ती स्वत:ला पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे कंपनी पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी राहण्याचे प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते. पण कंपनी विमानसेवा कधी सुरू करणार? किती विमान सुरू करणार? विमानसेवा पुन्हा सुरू होईल पण की नाही? अशा अनेक प्रश्नांमुळे कर्मचारी नोकरी सोडत आहेत आणि इतर एअरलाईन्सकडे वळत आहेत.
'नोकरी सोडायची असल्यास आधी 6 महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करा'
गोफर्स्ट एअरलाईन्सने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी न सोडण्याची विनंती केली आहे. परंतु, विमानसेवा कधी सुरू होईल याची हमी मिळत नसल्याने कर्मचारी नोकरी सोडत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याची माहितीही समोर आली आहे. तर, ज्यांना नोकरी सोडायची असेल त्यांनी किमान सहा महिन्याचा नोटीस कालावधी पूर्ण करावा, असा आदेश विमान कंपनीने दिला आहे. नोटीस कालावधी पूर्ण केला तरच कर्मचाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले जातील, असे कंपनीने सांगितले आहे.
हेही वाचा:
Punjab: पंजाबच्या सुवर्ण मंदिराजवळ पुन्हा एकदा भीषण स्फोट, 24 तासांत दोन वेळा स्फोट