नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांना सडेतोड शब्दात उत्तर दिलं आहे. नागपुरातून देशाचं सरकार चालत नाही, असं त्यांनी राजधानी दिल्लीतील कार्यक्रमात सांगितलं.

मागितला तरच आरएसएसकडून सल्ला दिला जातो, असंही मोहन भागवत म्हणाले. ‘भविष्यातील भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं.

“हा जो अंदाज लावला जातो, की नागपुरातून फोन जातो. सल्ला दिला जातो की कुणी काय करायचं? हे सर्व खोटं आहे. त्यांना सल्ला हवा असेल, तरच सल्ला दिला जातो”, असं मोहन भागवत म्हणाले.


''राजकारणावर आमचा कोणताही प्रभाव नाही आणि त्यांच्या सरकारवरही आमचा प्रभाव नाही. ते स्वयंसेवक आहेत. त्यांचाही स्वतःचा विचार आहे. या स्वातंत्र्याने आणि स्वायत्ततेनेच सरकार चालवलं जातं. घटनेनुसार सत्तेचं केंद्र अबाधित राहिलं पाहिजे, असं संघाचं मत आहे आणि असं न झाल्यास ते चुकीचंच असेल,'' असंही मोहन भागवत म्हणाले.

''राष्ट्रीय मुद्द्यावर आम्ही मत जरुर मांडतो. जे सरकारमध्ये आहेत, त्यांना वाटलं तर आमचं मत विचारतात. आम्ही मत मांडण्यात सक्षम असू तरच मत मांडतो, अन्यथा आमचा विचार थोपवत नाही. संघाने जन्मापासूनच निश्चित केलेलं आहे, की राजकारणाशी काहीही देणंघेणं नसेल,'' असं मत मोहन भागवत यांनी मांडलं.