मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इलेक्ट्रॉनिक टॅग वितरीत करण्यासाठी सार्वजनिक बँकांची मदत घेणार आहे. ऑटोमेटिक टोल पासची संख्या 50 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेऊन ही योजना बनवली जात आहे. या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयडीएफसी बँक आणि पेटीएमच्या माध्यमातून ई-टोलपास दिले जाणार आहेत.



"सर्व टोल प्लाझांसोबत सहज व्यवहार व्हावेत, हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्या आम्ही आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून टोलपास वितरीत करत आहोत. आतापर्यंत 60 हजार टोल पास टग्स वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी काही बँकांसोबत ईलेक्ट्रॉनिक वॉलेटचीही मदत घेतली जाणार आहे," असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा यांनी सांगितलं.



देशभरातील 356 टोल प्लाझावर ईलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनची सुविधा देण्यात आली आहे. तसंच या योजनेत नव्याने सहभागी झालेल्या बँक आणि पेटीएमची प्रायोगिक तत्त्वावर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य सर्व्हरवर चाचणी सुरु आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांत 50 टक्क्यांपर्यंत टोल कलेक्शन ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्याचं उद्दिष्ट आहे चंद्रा पुढे म्हणाले.



ईलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनसाठी आरएफआयडी चीप असलेला टॅग दिला जाणार आहे. या टॅगच्या माध्यमातून वाहनाची ओळख पटणार आहे, तसंच संबंधित वाहनधारकाच्या खात्यातून टोलची रक्कमही वजा होणार आहे.