सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये गौरी लंकेश दुसऱ्या क्रमांकावर होत्या, तर ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक गिरीश कर्नाड पहिल्या क्रमांकावर होते.
बंगळुरु एसआयटीच्या हाती लागलेल्या डायरीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे आणि त्याच्या साथीदारांची डायरी एसआयटीला सापडली. त्या डायरीत गिरीश कर्नाड यांचं नाव होतं.
कोण आहेत गिरीश कर्नाड?
80 वर्षीय गिरीश कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, अभिनेते, दिग्दर्शक आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्येही त्यांनी ठसा उमटवला आहे.
कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं आहे. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 1998 मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली आहेत.
गिरीश कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे. टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली आहे. 'उंबरठा' या स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.
दरम्यान, बंगळुरु एसआयटीने गौरी लंकेश हत्या प्रकरणात काल दहाव्या संशयिताला अटक केली. कोडगू जिल्ह्यातील मडिकेरीमध्ये राहणाऱ्या राजेश बंगेराला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
तपासादरम्यान बंगळुरु एसआयटीला एक डायरी मिळाली. या डायरीत गौरी लंकेश दुसऱ्या क्रमांकावर होत्या. या डायरीत नावं असलेले कट्टर हिंदुत्ववादाचे विरोधक आहेत. त्यांनी आपल्या वैचारिक मांडणीतून कट्टर हिंदुत्ववादाचा विरोधही केला आहे.
गिरीश कर्नाड यांच्यासोबत राजकीय नेते बी. टी. ललिता नाईक, मठाधीश वीरभद्र स्वामी आणि जेष्ठ विचारवंत सी. एस. द्वारकानाथ यांची नावंही या डायरीत आहेत. देवनागरी लिपीत ही नावं डायरीत लिहिली आहेत. अर्थातच ही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
गौरी लंकेशपूर्वी अभिनेते गिरीश कर्नाड हिट लिस्टवर?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2018 11:12 AM (IST)
मारेकऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये गौरी लंकेश दुसऱ्या क्रमांकावर होत्या, तर ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक गिरीश कर्नाड पहिल्या क्रमांकावर होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -