पवार-मायावती भेट, आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2018 12:03 AM (IST)
शरद पवार आणि मायावतींमध्ये दीड तास चर्चा रंगली. सध्याचं भाजपविरोधी वातावरण आणि विरोधी पक्षांची एकजूट यावर त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची आज दिल्लीमध्ये भेट झाली. मायावती यांच्या निवासस्थानी या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवार आणि मायावतींमध्ये दीड तास चर्चा रंगली. सध्याचं भाजपविरोधी वातावरण आणि विरोधी पक्षांची एकजूट यावर त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. संभाव्य पंतप्रधानांच्या उमेदवारीवरही या भेटीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, काँग्रेसमधून राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची महाआघाडी झाल्यास त्याचं नेतृत्व कोण करणार, याविषयीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.