गाझियाबाद : घरी परतण्यासाठी मजुरांची धडपड सुरु आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये आज (18 मे) सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: बोजवारा उडाला. श्रमिक ट्रेनसाठी नोंदणी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मजूर रामलीला मैदानात जमा झाले. आज संध्याकाळी गाजियाबादहून सहा श्रमिक ट्रेन्स रवाना होणार आहेत. यापैकी तीन ट्रेन बिहारच्या मुज्जफरनगर, रकसोल आणि पाटणा तर तीन उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, आजमगड आणि वाराणसीसाठी रवाना होतील. या ट्रेनच्या माध्यमातून सुमारे 7 हजार मजूर आपापल्या गावाला परतणार आहेत.


ट्रेनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाने मजुरांना थर्मल स्क्रीनिगं आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी थांबवलं होतं. पण घटनास्थळी हजारोंच्या संख्येने मजूर गोळा झाले. परिणामी स्थानिक यंत्रणांवर ताण आला. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम इथे अर्थहिन ठरले. काऊंटरवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मजुरांना पोलिसांनी पांगवलं.





गाझियाबादच्या घंटाघरजवळ असलेल्या रामलीला मैदानात मजुरांनी तुफान गर्दी केली. गर्दी एवढी वाढली आहे की, त्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. मजुरांसाठी रामलीला मैदानाशेजारी राहण्यासाठी कम्युनिटी सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु मजुरांची संख्याच एवढी जास्त होती की ही व्यवस्थाही कमी पडली.


गाझियाबादच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "बिहारसाठी गाझियाबादहून तीन ट्रेन सोडल्या जाणार आहेत. प्रत्येक ट्रेनमधून 1200 मजुरांना बिहारला नेल जाईल. आज सुमारे 3600 मजुरांना बिहारला पाठवलं जाईल. याशिवाय लखनौ, गोरखपूरच्या मजुरांनाही इथूनच रवाना केलं जाईल. सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती, पण आता जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे."


दुसरीकडे मजुरांचं म्हणणं आहे की, "आम्ही बराच वेळ उन्हात उभे आहोत. त्यामुळे फार अडचणी येत आहेत. आम्ही कालही आलो होतो पण नंबर आला नाही."