गाझियाबाद : राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वत:च्या आईच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करुन तिची हत्या केल्यानंतर, एक तरुणी तिच्या शिक्षिकेसोबत पती म्हणून राहत होती.


संबंधित तरुणीचे तिच्या शिक्षिकेसोबत समलैंगिक संबंध होते. त्यामुळे आईचा तिला विरोध होता. 9 मार्च रोजी तरुणीची शिक्षिका तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आली होती. पण ही गोष्ट आईला आवडली नाही. आईने तरुणी आणि शिक्षिकेला ओरडायला सुरुवात केली.

आईच्या वागण्याचा तरुणीला एवढा राग आला की, तिने आईच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. मुलीच्या हल्ल्यात आईला गंभीर दुखापत झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु 11 मार्चला तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या वडिलांनीच आपली मुलगी आणि तिच्या शिक्षिकेविरोधात गाझियाबाद पोलिसात तक्रार नोंदवली.

पोलिस मागील 20 दिवसांपासून तरुणी आणि शिक्षिकेचा शोध घेत होते, पण दोघीही फरार होत्या. आईच्या मृत्यूनंतर शिक्षिका तिला घेऊन लुधियानाला आली. तिथे तिला पुरुषाच्या वेशात वावरायला सांगितलं. तरुणीचा वेश आणि वागणं एवढं बदललं होतं की, ती मुलगी असल्याचा संशय कोणालाही आला नाही. ती पूर्णत: मुलाप्रमाणेच दिसत होती. लुधियानामध्ये दोघे पती-पत्नीसारखे राहत होते.

सुमारे 20 दिवसांनंतर पैसे संपल्यावर दोघीही गाझियाबादला आल्या. कोणीतरी याची माहिती पोलिसांना दिली. पैसे घेऊ दोघी लुधियाना जात असताना कवीनगर पोलिसांनी त्यांना 3 एप्रिलला अटक केली.

तरुणी आणि शिक्षिकेमध्ये मागील दोन वर्षांपासून संबंध होते. तरुणीच्या आईने अनेक वेळा याचा विरोध केला होता. याआधीही एक वेळा तरुणी शिक्षिकेसोबत पळाली होती. पण त्यावेळी पोलिसांनी तिला शोधून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.