गाजियाबाद (उत्तरप्रदेश): दिल्लीच्या जवळील गाजियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर सासूवर देखील गोळ्या झाडल्या.
गाजियाबादच्या मसूरीमध्ये राहणाऱ्या आरोपी सतेंद्रनं पत्नीवर असणाऱ्या संशयातून तिची हत्या केली. त्यानंतर आपल्या कारमधून पत्नीचा मृतदेह तिच्या माहेरी नेला आणि तिच्या आईवरही जीवघेणा हल्ला केला. सध्या पोलिसांनी आरोपी सतेंद्रला अटक केली आहे.
आरोपी सतेंद्र तेवतिया हा एका कॉलेजमध्ये लॅब असेस्टंट म्हणून काम करत होता. त्याच्या दाव्यानुसार मागील 13 वर्षापासून त्याच्या पत्नीवर त्याला संशय होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्नी राजकुमारी आणि सासू इंद्रवतीची बोलणं ऐकलं आणि त्याचा राग अनावर झाला. त्यानंतर बुधवारी त्याने गोळ्या झाडून पत्नीची हत्या केली. तर सासूच्याही हत्येचा त्यानं प्रयत्न केला.
दरम्यान, पत्नीच्या चारित्र्यावरील संशयामुळे आपण असं कृत्य केल्याचं आरोपीनं कबूल केलं. या संपूर्ण प्रकारणात आरोपीनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपण यू-ट्यूबवरुन काडतूस बनवायचं शिकलो. असं त्यानं पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी 302 कलम आणि सासूवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सतेंद्रवर 307 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.