नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना मंगळवारी (22 मार्च) दिल्लीच्या एम्समध्ये उपचारांसाठी आणण्यात आलं होतं. परंतु एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. सुत्रांच्या माहितीनुसार एम्सच्या डॉक्टरांनी लालू प्रसाद यादव यांना रांचीमधल्या रिम्समध्येच इलाज करण्याचा सल्ला दिला आहे. लालू यादव आज तीन वाजता दिल्लीहून रांचीसाठी रवाना होती. याआधी जेव्हा एम्समध्ये लालू यादव यांना आणण्यात आलं होतं तेव्हा त्यांना आपत्कालीन विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. यानंतर आज त्यांना पहाटे तीन वाजता डिस्चार्ज देण्यात आला.
किडनीमधील वाढतं इन्फेक्शन पाहता बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना मंगळवारी (22 मार्च) संध्याकाळी सहाच्या सुमारास विशेष विमानाने दिल्लीतील एम्समध्ये आणलं होतं. तिथे त्यांना रात्री नऊच्या सुमारास आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं.
रिम्सच्या मेडिकल बोर्डाच्या सल्ल्यानंतरच त्यांना दिल्लीमध्ये आणलं होतं. लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारतीने त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणलं होतं. याआधी रांचीमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (रिम्स) मेडिकल बोर्डाच्या महत्त्वाच्या बैठकीत मंगळवारी लालू प्रसाद यादव यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रिम्स संचालक डॉ. कामेश्वर प्रसाद म्हणाले की, "लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या हृदय तसंच मूत्रपिंडावर परिणाम झाला आहे. मागच्या वेळीही त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्समध्ये पाठवलं होतं." "लालू प्रसाद यादव यांच्या शरीरातील क्रिएटिनिन स्तर (लघवीत आढळणारा घटक) वाढत आहे. तो नियंत्रित करता येत नाही. लालू यादव यांचा क्रिएटिनिन स्तर 4.1 ने वाढून 4.6 झाला आहे," असं रिम्सच्या बोर्डाने सांगितलं.
याच दरम्यान डॉ विद्यापती यांनी सांगितलं की, "लालू यादव हे ब्लड शुगर, रक्तदाब, हृदय रोग, किडनीचे आजार, ताण, थॅलिसीमिया, प्रोस्टेट वाढणे, युरिक अॅसिड वाढणे तसंच मेंदूशी संबंधित अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. याशिवाय कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, उजव्या खांद्याच्या हाडात दुखणे, पायाच्या हाडाची समस्या तसंच दृष्टीदोष अशा समस्यानेही ग्रस्त आहेत. लालू प्रसाद यादव यांची किडनी केवळ 15 ते 20 टक्के क्षमतेसह कार्यरत आहे."