लखनौ : आग्य्राजवळ स्विस दाम्पत्याला झालेल्या मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच उत्तर प्रदेशातील रॉबर्टगंज रेल्वे स्थानकावर एका जर्मन नागरिकाला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.


रेल्वे कंत्राटदार अमन कुमार यांनी मारल्याचा आरोप होल्गर एरिक नामक जर्मन नागरिकाने केला आहे. रेल्वे स्थानकावर सर्कल ऑफिसरला या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. आगोरी फोर्टला जाण्यासाठी वाराणसीहून एरिक सोनभद्रामध्ये आला होता.

अमन कुमार यांनी मात्र एरिकनेच आपल्याला ठोसा लगावल्याचा दावा केला आहे. 'मी वेलकम टू इंडिया म्हणत त्याचं स्वागत केलं, तर त्यानेच मला बुक्का मारला आणि अंगावर थुंकला' असं आरोपी अमन कुमार यांनी म्हटलं आहे.

'अतिथी देवो भव'ला गालबोट, फतेहपूर सिक्रीत स्विस जोडप्याला मारहाण


एरिकने मीडियाशी बोलण्यास नकार दिला असून रेल्वे अधिकाऱ्यांनीही एरिकचं बोलणं सुसंगत नसल्याचं म्हटलं आहे. एरिकला मदत करु इच्छिणाऱ्या इतर रेल्वे अधिकाऱ्यांशीही त्याने उद्धट वर्तन केलं, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अमन कुमार यांनी एरिकचं स्वागत करत विचारपूस केली. मात्र त्याला त्याचा राग आला असावा आणि त्याने अमन यांना मारलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमन कुमारांनी एरिकला मारलं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भारतात फिरण्यासाठी आलेल्या स्विस जोडप्यासोबत अशीच एक घटना घडली होती. फतेहपूर सिक्रीमध्ये या जोडप्याला स्थानिक तरुणांनी दगड आणि काठ्यांनी मारहाण केली.