क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू, बँक खात्यात अडकले कोट्यवधी डॉलर्स
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2019 02:27 PM (IST)
काल परवापर्यंत गेरॉल्ड कॉटन हे नाव कॅनडा बाहेर फारसं कोणाला माहित नव्हतं. परंतू आज जगभरातले सायबर तज्ज्ञ त्याच्या बँक अकाउंटचा पासवर्ड शोधण्यात गुंतले आहेत.
फाईल फोटो
मुंबई : काल परवापर्यंत गेरॉल्ड कॉटन हे नाव कॅनडा बाहेर फारसं कोणाला माहित नव्हतं. परंतू आज जगभरातले सायबर तज्ज्ञ त्याच्या बँक अकाउंटचा पासवर्ड शोधण्यात गुंतले आहेत. त्याचं कारण आहे गेरॉल्डच्या बँक खात्यात जमा असलेले 180 कोटी डॉलर्स. कॅनडाच्या गेरॉल्ड कॉटन हा क्वाड्रीगासी एक्स या क्रिप्टोकरन्सी कंपनीचा सीईओ होता. जेमतेम तिशीत असलेला गेरॉल्ड गेल्या महिन्यात एक अनाथाश्रम सुरु करण्यासाठी भारतात आला होता. भारतात आल्यानंतर गेरॉल्ड आजारी पडला आणि या आजारपणातच त्याचा मृत्यू झाला. परंतू गेरॉल्डच्या बँक खात्यात कंपनीच्या 11 लाख गुंतवणूकदारांचे तब्बल 180 कोटी डॉलर्स अडकले आहेत. त्यामुळे जगभरातील अनेक सायबर तज्ज्ञ सध्या गेरॉल्डच्या बँक अकाउंटचा पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गेरॉल्डच्या मृत्यूनंतर त्याच्या कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कंपनीला त्यांच्या गुंतवणूकदारांना पैसे द्यायचे आहेत परंतू पासवर्डच नसल्यानं त्यांचे हात बांधले गेले आहेत. त्यामुळे गेरॉल्डची पत्नी जेनिफर रॉबर्टसन् ने या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून परवानगी मागितली आहे. गेरॉल्डचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा लॅपटॉपही त्याच्याजवळच होता. पण तो इन्क्रीप्टेड् असल्यानं पासवर्ड शोधण्यात तज्ज्ञांना अधिकच अडचणी येत आहेत. जोपर्यंत गेरॉल्डच्या अकाउंटचा पासवर्ड रिकव्हर होत नाही तोपर्यंत कॅनडातल्या 11 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचं भवितव्य आधांतरीच आहे.