नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या वक्तव्याला पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मनिरपेक्ष संघटना आहे', असं विद्यासागर राव म्हणाले होते. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष आहे तर मी इंग्लंडची राणी आहे, अशा उपहासात्मक शब्दात त्यांनी विद्यासागर राव यांच्या वक्त्याव्यवर उत्तर दिलं आहे.


मंगळवारी विद्यासागर राव यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतीसुमने उधळली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष संघटना आहे तसेच सर्व समावेशक संघटन आहे. या संघटनाने लोकांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर केला आहे, असं ते म्हणाले.



जर आरएसएस ही धर्मनिरपेक्ष संघटना आहे तर मी पण इंग्लंडची राणी आहे आणि मी हे ट्वीट चंद्रवरुन केलं आहे, असं ट्वीट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.

यापूर्वीही नरेंद्र मोदी यांनी जेव्हा काश्मीरमध्ये भाषणाची सुरुवात काश्मिरी भाषेत केली होती. त्यावेळीही मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट केलं होतं की, काश्मिरी भाषेत भाषणाची सुरुवात करण्याचा चांगला प्रयत्न होता. मात्र हे भाषण चीनी भाषेत लिहिलं आहे, असं वाटतं. अशी खिल्ली त्यांनी उडवली होती.