नवी दिल्ली : बिहारच्या गया येथील विद्यार्थी हत्येप्रकरणी पोलिसांनी जेडीयूच्या आमदार मनोरमा देवी यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. रॉकी यादव असं आमदाराच्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी अटकेच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यास नकार दिला. पोलिस आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित माहिती देण्याची शक्यता आहे.


 

गाडी ओव्हरटेक करण्यावरुन शनिवारी रॉकी आणि आदित्य नावाचा पीडित मुलगा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर रॉकीने रस्त्यावरच गोळी मारुन त्याची हत्या केली होती. या घटनेनंतर रॉकी फरार झाला होता. पोलिस त्याच्या शोधात होते.

 

कोण आहे रॉकी

रॉकी उर्फ राकेश रंजन यादववर बिहारच्या गया येथील बारावीत शिकणाऱ्या आदित्य नावाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. रॉकीला पहिल्यापासूनच नेमबाजीची हौस असल्याचं लोक सांगतात. बापाच्या दहशत पसरवण्याच्या स्टाईलमुळे रॉकीला जणू प्रत्येक गोष्टीचं अभय आहे. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या बंदुकींचे परवानेही आहेत.

 

रॉकी शाळेपासून कॉलेजपर्यंत अभ्यासातही चांगला असल्याचं लोक सांगतात. रॉकीने दिल्लीच्या एअरफोर्स स्कूलमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जेएनयू विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं. सध्या रॉकी जेएनयू विद्यापीठामध्येच एमएच्या अंतिम वर्षात आहे. सोबतच नागरी सेवा अभ्यासाची तयारी देखील करत आहे.

 

रॉकीची आई जेडीयू पक्षाच्या विधानपरिषद आमदार आहे. तर वडील बिंदी यादव त्यांच्या भागातील दहशती व्यक्ती म्हणून परिचित आहेत. बिंदी यांच्यावर अनेक प्रकारच्या केसेस दाखल आहेत. नक्षलवाद्यांना हत्यारं पुरवण्याच्या आरोपाखाली बिंदी यादव यांनी तुरुंगवासही भोगलेला आहे.

 

आदित्यच्या बारावी परीक्षेचा निकाल बाकी

 

आदित्य असं हत्या झालेल्या मुलाचं आदित्य नाव आहे. आदित्य हा गया येथील थॉमस कॅथॉलिक स्कूलमध्ये शिकत होता. त्याने नुकतीच सीबीएसई बोर्डातून बारावीची परीक्षा दिली होती. आदित्यच्या बारावी परीक्षेचा निकाल अजून येणार आहे.