नवी दिल्लीः आपल्यासाठी देश आणि देशवासीयांचं संरक्षण महत्वाचं आहे, अशा शब्दात भारताचा सलामीवर फलंदाज गौतम गंभीरनेही सध्याच्या पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी आणि भारत-पाक क्रिकेट संबंधावर मत व्यक्त केलं आहे.
ज्या आईने आपला मुलगा गमावला आहे, ज्याने आपल्या घरातला पुरुष गमावला आहे, अशांच्या नातेवाईकांना पाकिस्तानसोबत क्रिकेट किंवा बॉलिवूडसाठी संबंध ठेवायचे की नाही, हा प्रश्न विचारा. त्याचं अचूक उत्तर मिळेल, असं रोखठोक मत गंभीरने व्यक्त केलं.
ज्या कलाकारांकडून पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन करण्यात आलं त्यांचाही गंभीरने समाचार घेतला. एसी रुममध्ये बसून क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये राजकारण आणू नये, असं म्हणणं सोपं आहे. पण ज्यांनी आपल्या पोटचं मुल गमावलं आहे, त्यांना पाकिस्तानसोबत संबंध ठेवावे वाटतील का, असा सवालही गंभीरने केला.
पाकिस्तानकडून सीमेवरील उल्लंघन जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत क्रिकेटमध्ये कसलेही संबंध नसावेत, असं मतही गंभीरने व्यक्त केलं.
सीमेवर आपलं संरक्षण करताना ज्या निरापराध जवानांचा जीव जातो, त्यांच्या भावनांचा आदर ठेवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यांच्यापुढे सिनेमा आणि क्रिकेट काहीच नाही. त्यामुळे पाकिस्तानसोबत कसलेही संबंध नसावेत, असं गंभीरने म्हटलं.