मुंबई : जगभरात कोरोनामुळे मंदी आली असताना, भारताची अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र अनेक पटींनी वाढ होत असल्याचं समोर येत आहे. अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ कायम राहिल्यास भारताचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी लवकरच मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यावर मात करत आशियातील सर्वात श्रीमंत ठरु शकतात. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) च्या मते, आज बुधवारपर्यंत 68.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत 15 व्या क्रमांकावर आले आहेत आशियातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी 75.8 अब्ज डॉलर्सच्या वैयक्तिक संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आहेत.
अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत मागील आठवड्यात चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकलं आहे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. जगाचा विचार करता ते श्रीमंतांच्या यादीत 15 व्या स्थानी आले आहेत.
Bloomberg Billionaires Index च्या मते, अदानी यांच्या संपत्तीत वाढ होऊन ती आता 68.4 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. या एकाच वर्षात अदानी यांच्या संपत्तीत 34.76 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यांच्यापुढे मुकेश अंबानी असून त्यांची संपत्ती ही 75.8 बिलियन डॉलर इतकी आहे. चीनच्या शानशान यांची संपत्ती 63.6 बिलियन डॉलर इतकी आहे. अदानी यांच्या संपत्तीचा वाढता दर पाहता लवकरच ते अंबानी यांना मागे टाकतील असं सांगण्यात येतंय.
फेब्रुवारी महिन्यात रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी चीनच्या शानशान यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला होता. या वर्षी अदानी ग्रीन, अदानी एन्टरप्रायझेस, अदानी गॅस , अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही वर्षापासून अदानी हे जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या उद्योगाचा यशस्वी विस्तार करताना दिसत आहे.
अमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ही 188 बिलियन डॉलरच्या वर आहे.