बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला कर्नाटक सरकारनं 10 लाखांचं बक्षीस घोषित केलं आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा केली.


'गौरी लंकेश यांच्या खुनाप्रकरणी लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या खुनाच्या चौकशीसाठी आम्ही एसआयटीचे अधिकारी नेमले आहेत. तसेच गरज पडल्यास आणखी अधिकाऱ्यांची नेमणूक करता येईल.' अशी माहिती रामलिंगा रेड्डी यांनी दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरैमय्या यांनी तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. या खुनाच्या चौकशीसाठी 21 सदस्यांची एसआयटी नेमण्यात आली आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरला राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

कोण होत्या गौरी लंकेश ?

गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

गौरी यांच्याविरोधात गेल्यावर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता.

2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.

2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.