रोहतक : हरियाणातील रोहतक मध्ये 21 वर्षीय गँगरेप पीडितेवर पुन्हा एकदा गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन वर्षांपूर्वी संबंधित पीडितेवर ज्यांनी गँगरेप केला होता, त्या दोघा दोषींसह पाच जणांनी पुन्हा गँगरेप केल्याचा आरोप आहे.

 
रोहतक जिल्ह्यातील भिवानीमध्ये तीन वर्षांपूर्वी काही जणांनी एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील दोन दोषी जामिनावर सुटले. त्यानंतर रोहतकमधील तिघांच्या साथीने या दोघांनी पुन्हा तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप आहे.

 
भिवानी गँगरेप प्रकरणानंतर तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत होता. त्यानंतर पीडितेसह कुटुंब रोहतकमध्ये राहण्यास गेलं. बुधवारी पीडित तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली, मात्र परत न आल्याचं तिच्या आईने सांगितलं.

 

रात्री ती बेशुद्धावस्थेत सुखपुरा चौकात सापडली, त्यावेळी तिचे कपडे पूर्णपणे फाटले होते.  तिला तातडीने रोहतक रुग्णालयात नेण्यात आलं. तक्रार मागे न घेतल्यामुळेच तिच्यावर पुन्हा गँगरेप झाल्याचा दावा कुटुंबीयांतर्फे करण्यात येत आहे.

 
कॉलेजच्या गेटवर उभी असताना आपलं अपहरण केल्याची माहिती पीडितेने दिली आहे. कारमधून निर्जन स्थळी नेऊन बलात्कार केल्याचंही तिने म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तिने पाच आरोपींची नावं सांगितल्याचंही रोहतकच्या डीएसपी पुष्पा खत्रींनी सांगितलं आहे.